- कारवाईमागे माजी मुख्यमंत्र्यांचा हात..
- मावळचे आमदार सुनील शेळके यांचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२१) :- एक सक्षम नेतृत्व म्हणून महाराष्ट्रातील जनता अजित पवार यांच्याकडे पाहत असल्याने भाजप नेत्यांचा पोटशूळ उठत आहे. दादांच्या नातलगांवरील केंद्रीय आयकर विभागाच्या कारवाईमागील पडद्यामागचे सूत्रधार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असल्याचा गंभीर आरोप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी केला.
मंत्रालयात सकाळी सहा वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत आलेल्या नागरिकांचे प्रश्न पवार सोडवितात हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे केंद्रीय संस्थाचा गैरवापर करून त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास दिला जात आहे. काही भाजप नेते जाणीपूर्वक त्यांना बदनामी करण्याचा डाव आखत आहेत.
यामागील खरे सूत्रधार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत. माजी खासदार किरीट सोमय्या, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यासारखे नेते महाविकास आघाडी सरकारवर खोटेनाटे आरोप करून बदनामी करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आहेत. पण, महाराष्ट्रातील सुज्ञ जनता या भूलथापांना कदापी बळी पडणार नाही. ज्यांची सत्ता गेली. त्या भाजप नेत्यांना वाटते, आता पुन्हा आपली सत्ता येणार नाही म्हणून ही षडयंत्रे रचण्याचे काम सुरू असल्याचा आरोप आमदार शेळके यांनी केला.