- शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी..
- पिंपरी चिंचवड शहरात सत्ताधारी भाजप बंद यशस्वी करू देणार? बंदला मनसेचाही विरोध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२१) :- उत्तर प्रदेशातील लखिमपूर खीरी येथे आंदोलनकर्त्या शेतकर्यांना गाडी खाली चिरडण्यात आल्याच्या घटनेचा निषेध आणि शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून राज्यातील सत्ताधारी आघाडीने सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदमधून सर्व अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्याने दैनंदिन जनजीवनावर फारसा परिणाम होणार नाही.
या बंदला पिंपरी चिंचवड शहरातून भाजप, मनसे या राजकीय पक्षांसह काही व्यापार्यांनी विरोध दर्शवला आहे. शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन भोसले, राष्ट्रवादीचे संजोग वाघेरे, काँग्रेसचे नूतन शहराध्यक्ष कैलास कदम आणि मित्र पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बंद कडकडीत करणार असल्याचे आणि जनतेला या बंदला स्वत:हून पाठिंबा देऊन सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. बंदमध्ये तीनही पक्ष उतरल्याने शहरातील व्यवहार थंडावणार की सत्ताधारी भाजप बंदचा इरादा हाणून पाडणार ? याचे उत्तर लवकरच मिळेल.
महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला काही व्यापार्यांनी विरोध केला आहे. उद्या दुकाने सुरूच राहतील. मात्र, आमचा शेतकर्यांना पाठिंबा आहे. बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका, असे आवाहन व्यापारी संघाच्या काही पदाधिक-यांनी केले आहे. कोरोनानंतर बर्याच वेळाने दुकाने सुरू झाली आहेत. सध्या नोकरांचा पगार देणेसुद्धा जिकीरीचे झाले आहे. आमचा शेतकर्यांना पाठिंबा आहे, अशी भूमिका शहरातील व्यापाऱ्यांची आहे.