- तब्बल ६१ दुचाकी जप्त; शहरातील ५८ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. ऑक्टोबर २०२१) :- दोन आरोपींकडे चोरीच्या दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना शिताफीने पकडले. त्यांनी आणखी दोन साथीदारांच्या सहाय्याने दुचाकी चाेरी केल्याचे पोलिसांपुढे कबुल केले. दुचाकीच्या हॅण्डलचे लॉक तोडून, बनावट कागदपत्रे तयार करून चोरीच्या दुचाकी खासगी बसने किंवा स्वतः चालवून खानदेश व मराठवाड्यात आरोपींनी दुचाकी विक्री केल्या.
पोलिसांनी धुळे, जळगाव, चाळीसगाव, लातूर, नांदेड, परभणी, अहमदनगर येथून ६१ वाहने जप्त केली. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील ४८, पिंपरी पोलीस ठाण्यातील चार तर निगडी पोलीस ठाण्यातील एक व इतर पाच, अशा तब्बल ५८ दुचाकी चोरींचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तब्बल १९ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोविंद मुलचंद सोलंकी (वय २५, रा. चिंचवड, मूळगाव देवास, मध्यप्रदेश), संदेश उर्फ संजय अंकुश जाधव (वय २८, रा. मोरेवस्ती, चिखली), सद्दाम अब्दुल शेख (वय २६, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली), आदिनाथ अशोक राजभोज (वय १९, रा. अजिंठा नगर, निगडी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चिखली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई केली.