- कामगारमंत्र्यांचा हा निर्णय चुकीचा; फक्त जुन्या बाटलीत नवीन दारू – बाबा कांबळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२१) :- कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी असंघटित रिक्षा, टॅक्सीचालक, ट्रक चालक यांच्यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवरती कल्याणमंडळ स्थापन करण्यास परवानगी दिली आहे. त्यांनी रिक्षा चालक व त्यांच्या प्रतिनिधीसोबत चर्चा न करता एकतर्फी आणि चुकीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रिक्षा, टॅक्सी चालक मालकांचे मोठे नुकसान होणार आहे. रिक्षा व टॅक्सी चालकांची ही फसवणूक असून, कामगारमंत्र्यांच्या निर्णयाला आम्ही तीव्र विरोध करणार आहोत. पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, ठाणेसह महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष आणि कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिली आहे.
बाबा कांबळे म्हणाले, रिक्षा, टॅक्सीचालक हा स्वयं रोजगार करणारा घटक असून त्यास कामगार म्हणता येणार नाही. रिक्षा चालकांचे सर्व कामकाज परिवहन विभाग अंतर्गत करण्यात येत असून, लायसन्स बॅच, परवाना, परिवहन विभाग देत आहे. यामुळे परिवहन विभागअंतर्गत रिक्षा, टॅक्सी चालक-मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, अशी आमची मागणी आहे. परंतु, कामगार मंत्री हसन मुश्रीफ मात्र, कामगार विभाग सोडून परिवहन संबंधित असणाऱ्या विभागातवर अतिक्रमण करत आहेत.
मुळात कामगार विभागाकडील घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ, बांधकाम कामगार कल्याण मंडळ, सुरक्षा रक्षक मंडळ यांना न्याय देण्यास व त्यांचे प्रश्न सोडवण्यास कामगार विभाग अपयशी झालेला आहे. रिक्षा कल्याणकारी मंडळाला मान्यता देणे म्हणजे जुन्या बॉटलमध्ये नवीन दारू असल्याचा प्रकार आहे. यापूर्वीदेखील अनेक वेळा तामिळनाडूच्या धर्तीवर कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय झालेला आहे. परंतु, तो निर्णय फसलेला आहे पूर्वीच्या कामगार मंत्र्यांनी देखील असे निर्णय घेतले आहेत. तो निर्णय का फसला याचा अभ्यास हसन मुश्रीफ यांनी केलेला दिसत नाही, असे बाबा कांबळे म्हणाले.














