- अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याचे काम असताना काढले २० हजार किऑक्स..
- भाजपच्या वरीष्ठ नेतृत्वाकडून कारवाई होणे अपेक्षित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या सत्ताकाळात धाकधपटशाहीचा कारभार सुरू आहे. सत्तेचा दुरूपयोग करून मर्जीतील ठेकेदाराला पुढे करून कोट्यवधी रुपयांची कामे घेतली जात आहेत. घेतलेले काम पूर्ण न करताच त्यापोटी कोट्यवधी रुपयांची बिले लाटली जात आहेत. आकाशचिन्ह परवाना विभागाकडील शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याचे काम घेतलेल्या एका ठेकेदाराने काम न करताच भलताच उद्योग केला आहे. कामाच्या करारनाम्यात नामोल्लेख नसताना विद्युत पोलवर लावलेली २० हजार किऑक्स बेकायदेशीरपणे काढली आहेत. याउलट होर्डिंग्ज काढल्याची खोटी माहिती प्रशासनाला सादर करून त्यापोटी २ कोटींची बिले वसूल केली आहेत. यामध्ये भाजप संघटनेतील एका पदाधिका-याचा हात असल्याची माहिती समोर आली असून भाजपचा तो पदाधिकारी कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत होर्डिंग्जमुळे बकालपणा वाढला आहे. महापालिकेतील आकाशचिन्ह परवाना विभागाद्वारे २०१७-१८ मध्ये अनधिकृत होर्डिंग्ज स्ट्रक्चरसह काढण्याची दोन कोटी खर्चाची निविदा राबविण्यात आली. एका संस्थेला हे काम देण्यात आले. झालेल्या करारनाम्यातील अटी व शर्तींनुसार निर्धारित काम करणे बंधनकारक असताना ठेकेदार संस्थेने अनधिकृत होर्डिंग्ज बाजुला ठेवून २० हजार किऑक्स काढली. त्यानंतर अनधिकृत होर्डिंग्ज काढल्याची खोटी माहिती सादर करून दोन कोटींची बिले सादर केली. दोन कोटींची बिले देखील उचलली. त्यानंतर लेखापरिक्षणात हा सगळा प्रकार उघडकीस आला. मूळात अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याचे काम असताना किऑक्स काढल्याची बाब मुख्य लेखापरिक्षणात समोर आली. त्यामुळे ठेकेदाराचे बिंग फुटले आहे. यामध्ये शहरातील भाजप संघटनेतील एका पदाधिका-याचा हात असल्याची चर्चा केली जात आहे.
प्रशासनावर दबाव टाकून लाटली दोन कोटींची बिले
महापालिकेतील आकाशचिन्ह परवाना विभागाद्वारे शहरातील अनधिकृत होर्डिंग्जची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण घेण्यात आले. त्यामध्ये पालिका हद्दीमध्ये एकूण १ हजार ७६८ होर्डिंग्ज अनधिकृतपणे उभारण्यात आली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर ती हटवण्यासाठी वेगळी अशी निविदा काढण्यात आली. यामध्ये भाजप संघटनेतील एका पदाधिका-याचा सुरूवातीपासून सहभाग आहे. हे काम मिळवण्यासाठी या पदाधिका-याने आकाशचिन्ह परवाना विभागातील एका निवृत्त पदाधिका-याला हाताशी धरून प्रशासनावर दबाव आणला. त्यानंतर या ठेकेदाराला काम देण्यात आले. काम करण्यापेक्षा खोटी माहिती सादर करून दोन कोटींची बिले काढण्याचा प्रताप त्याच पदाधिका-याचा आहे. या पदाधिका-याचे नाव उघडपणे घ्यायला कोणी तयार नाही. ठेकेदाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याने पालिकेत कोट्यवधी रुपयांची लूट केल्याची चर्चा आहे. या भ्रष्ट पदाधिका-यावर पक्षाच्या वरीष्ठ स्तरावरून कारवाई होणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.