- मानधनापोटी ३२ लाखांचा खर्च; सभेची मान्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२१) :- महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ३५ पदांची हंगामी स्वरुपात तीन वर्षे कालावधीकरिता भरती करण्यात येणार आहे. या पदांना दरमहा मानधनापोटी ३२ लाख रुपये खर्च होणार आहे. याशिवाय प्राध्यापक संवर्गातील १४ आणि शिक्षकेतर १४ अशी एकूण २८ मानधनावरील पदांची भरती करण्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत त्यास परवानगी मिळाली आहे. सध्या वायसीएम रुग्णालयात नऊ विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाला असून नवीन चार विषय प्रस्तावित आहेत.
३५ पदांची भरती हंगामी स्वरुपात तीन वर्षे कालावधीकरिता करण्यासाठी ४ जून २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. ही रिक्त पदे भरण्यासाठी २१ जून २०२१ अखेरपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. प्राप्त झालेल्या अर्जाची निवड समितीतर्फे छाननी करून पात्र ठरलेल्या उमेदवारांची ५ जुलै ते ७ जुलै २०२१ या कालावधीत मौखिक मुलाखती घेऊन गुणांकनानुसार विविध विषयातील १३ अध्यापकांची निवड समितीने केली आहे.