- भोंदू किरीट सोमय्या यांच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा फाडणार – सुलभा उबाळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२१) :- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना पत्र पाठवून पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट सिटी अंतर्गत ५०० ते ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. या घोटाळ्याच्या तळाशी जाऊन ईडी, सीबीआय चौकशीसाठी सोमय्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलं होतं. मात्र, किरीट सोमय्या यांनी याकडे कानाडोळा केला. या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्रित आज शुक्रवारी (दि. २२) रोजी महापालिकेत उपरोधिक आंदोलन केले.
महापौर दालनासमोर प्रतिकात्मक किरीट सोमय्या यांच्याकडे स्मार्ट सिटीतील घोटाळ्याची फाईल उपरोधिकपणे सुपूर्द करत ईडीकडे तक्रार करावी. चौकशी लावण्याची हिम्मत दाखवावी, अशी मागणी दोन्ही पक्षाच्या वतीने करण्यात आली.
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेस शहरप्रमुख सचिन भोसले, शिवसेनेच्या शिरुर संघटिका सुलभा उबाळे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, धनंजय आल्हाट, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे आदी उपस्थित होते.
सुलभा उबाळे म्हणाल्या, महाविकास आघाडीमधील भ्रष्टाचार काढून काही व्यक्तींना बदनाम करण्याचं काम सोमय्या करत आहेत. मात्र पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचार त्यांना दिसत नाही. म्हणून त्यांचा आज बुरखा फाडून आंदोलन करण्यात आले. भाजपा नेते आमदार प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांचीच कंपनी असलेल्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून ही लूट झाल्याचे कागदोपत्री पुरावे सांगतात. आता शिवसेना आपल्या पध्दतीने या भोंदू किरीट सोमय्या यांच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा फाडणार आहे. ५२० कोटींच्या कामात १७० कोटींचा घोटाळा तर एकूण १३०० कोटींच्या कामात ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप उबाळे यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्मार्ट सिटीच्या घोटाळ्याची चौकशी करावी, महापालिका आयुक्तांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा शिवेसेना आगामी काळात या पेक्षा आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवेसेना संघटिका सुलभा उबाळे यांनी दिला आहे.














