- मेट्रो व्यवस्थापनाची शहरातील एनजीओसोबत बैठक..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२१) :- स्मार्ट सारथी, महामेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील एन.जी.ओ (सार्वजनिक संस्था) नां पाहणी दौऱ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्या प्रसंगी मेट्रो स्टेशन व मेट्रो च्या कार्यप्रणालीबद्दल महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. या प्रसंगी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीसोबत पाहणी दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी उपमहाप्रबंधक टी मनोजकुमार डेनिअल, महामेट्रो समन्वयक अमोल मुदले, माझी वसुंधरा अभियानाच्या भाग्यश्री, स्मार्ट सारथीचे समन्वयक अमोल देशपांडे, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, विजय मुनोत, अर्चना घाळी, दाभोळकर, अँड. विद्या शिंदे, संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी, विशाल शेवाळे, संदीप सकपाळ, तेजस सापरिया, जयेंद्र मकवाना उपस्थित होते.
महामेट्रोचे उपमहाप्रबंधक टी मनोजकुमार म्हणाले, “देशात महामेट्रोचे अनेक शहरात जाळे उभे राहत आहे. उन्नत टेक्नॉलॉजीमुळे मेट्रोचा प्रवास सुखकर आणि वेगाने आता पार पडणार आहे. प्रवाश्यांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे. तीन भागांच्या मेट्रो कोचमुळे एका वेळेस ९५० प्रवाशी प्रवास करू शकतात. शिवाय विविध प्रकारच्या सोयीसुद्धा मेट्रो कोचमध्ये उपलब्ध असणार आहेत. मोफत मोबाईल चार्जिंग, वाय – फाय सुविधा, सायकल सुद्धा प्रवासात बरोबर नेता येणार आहे. दोन लाईन, ३० स्थानके असणार आहेत. दुसऱ्या फेज च्या कामात निगडीपर्यंत मेट्रो नेण्यात येणार आहे. भविष्यात तळेगाव, चाकण, शिक्रापूर, पुरंदर, मुळशी भागातून जाणाऱ्या रिंग रेल्वेला शहरातील मेट्रो मार्ग जोडण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याचप्रमाणे मेट्रोमुळे पुण्यातील मागत्वाच्या रस्त्यावरील वाहतुकीवरसुद्धा वाहनांचा ताण कमी होणार आहे. चाकरमान्यांसाठी मेट्रो वरदान ठरणार आहे. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात कमी वेळात त्यांना पोहचता येणार आहे.”
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, ” मेट्रोचे दुसऱ्या फेज निगडीपर्यंतचे काम न थांबता तातडीने सुरू करावे. पिलर उभारणीचे काम २०२२ मध्ये पूर्ण झाल्यास प्रवाशांना निगडी ते स्वारगेट असा प्रवास कमी वेळात पूर्ण करावयास मिळेल. सध्या पिंपरी चिंचवड शहरातील पश्चिम भागामधील उपनगरातील रहिवाश्यानां मेट्रो वापर करण्यासाठी पिंपरी पर्यंत यावे लागणार आहे. त्यामुळे अनेकांना मेट्रोचा लाभ मिळणार नाही. याकरिता निगडी मेट्रोचे काम सलग वेळेत सुरू करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हिंजवडी आय टी पार्क, निगडी, तळवडे, चाकण उद्योगनगरी असा ही मेट्रोचा डीपीआर सुद्धा भविष्यात बनवल्यास दररोज हजारो प्रवाश्यांना त्याचा उपयोग होईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मेट्रोमुळे नक्कीच बळकट होणार यात शंका नाही.”












