न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २३ जाने.) :- शैक्षणिक संस्थांनी शाळेत एक वैज्ञानिक मंडळाची स्थापना करून एक वैज्ञानिक चळवळ उभी करावी. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण होईल आणि विज्ञाननिष्ठ विद्यार्थी घडतील, असा विश्वास ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ अशोक नगरकर यांनी केले.
म्हेत्रे वस्ती चिखली येथील राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्था संचलित विश्वरत्न इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने आयोजित केलेल्या विवेक व्याख्यानमालेत विज्ञान आणि समाज या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. यावेळी नगरकर यांना आदर्श शास्त्रज्ञ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी युवा संशोधक अंकिता नगरकर, जलअभ्यासक रामदास जंगम, प्रा.के एस पाटील, अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व्यंकट वाघमोडे, उपाध्यक्ष मोहन देवकाते, राजेंद्र घोडके, अजित घोडके आदी उपस्थित होते.
डॉ. नगरकर पुढे म्हणाले की, दैनंदिन जीवनात वावरताना प्रत्येक कृती ही विज्ञानाशी संबंधीत आहे. सकाळी उठल्यापासून टूथपेस्ट व ब्रश, साबण, मोबाईल, मोटर ही साधणे विज्ञानाचा आविष्कार आहे. यावेळी अंकिताने स्वतःच्या नावावर असलेल्या १० पेटंटची माहिती देत म्हणाली की, जे कराल ते काहीतरी वेगळेपणाने करा.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष वाघमोडे यांनी केले. सूत्रसंचालन रोहिणी बुरुंगे, तर आभार जानवी भोरगिर यांनी मानले.











