न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २३ जाने.) :- फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि पिंपरी-चिंचवड शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अभय भोर यांच्या दालनात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भोसरी येथे उद्योजकांच्या विविध समस्यांबाबत बैठक संपन्न झाली. या बैठकीस परिसरातील उद्योजक, व्यापारी, कामगार व झोपडपट्टी परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी फोरमचे अध्यक्ष अभय भोर, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, फोरमचे उपाध्यक्ष कार्तिक गोवर्धन, बालाजीनगरचे कार्यकर्ते इस्माईल नदाफ, संतोष गायकवाड, फोरम इव्हेंट ग्रुपचे मुजफ्फर इनामदार, चेतन साबळे, रमेश बटवाल, कृष्णा वाघमारे, विक्रमजीत दत्ता, भाऊसाहेब आडगळे, ए बी शेख, ऋषिकेश तावरे, श्रीकृष्ण नरहरी, लातूर भागाचे केतन बटवाल, पोपटराव लोखंडे पाटील व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी भोर यांनी एमआयडीसीतील विविध समस्यांचा उहापोह खासदारांसमोर केला. ते म्हणाले की, महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छ सर्वेक्षण राबविले जात आहे. या माध्यमातून महापालिका शहरात आधुनिक स्वच्छतागृह उभारत आहे. गेली चार महिन्यांपासून या परिसरात स्वच्छतागृह उभारणीसाठी महापालिकेशी सातत्याने पत्रव्यवहार चालू आहे. परंतु, पालिकेने या परिसरात एकही महिला स्वच्छतागृह उभारलेले नाही. तसेच शहरातील बहुतांश तरुण हे बेरोजगार आहेत, उच्चशिक्षित आहेत. परंतु, एमआयडीसी भागात त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध नाही. महापालिकेने जो लघु-उद्योजकांचा प्रकल्प हाती घेतलेला आहे, त्याला चालना द्यावी. तसेच नव-उद्योजक महिलांसाठी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स तसेच तरुण गटांना इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून तरुणांना रोजगार सुरू करता येईल.
बालाजीनगर परिसरातून नेहरूनगर भागात असंख्य विद्यार्थी पायी वाटचाल करतात. रहदारी असल्यामुळे त्यांना रस्ता क्रॉस करता येत नाही. त्याकरीता मनपाने भुयारी मार्ग किंवा पादचारी पूल उभारावा. एमआयडीसी परिसरातील पर्यावरण उद्यानांमध्ये सुधारणा करून, उद्योजकांसाठी जॉगिंग पार्क तसेच आरोग्य शिबिरे व सहली आयोजित करण्यासाठी उद्योगांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी भोर यांनी यावेळी केली.
आढळराव म्हणाले की, उद्योकांच्या सर्व समस्यांचे एकत्रित निवेदन द्यावे. तसेच महानगरपालिका व एमआयडीसी अधिकारी यांची बैठक घेऊन, सविस्तर मागण्या पूर्ण करण्यात येतील. तसेच नाशिक फाटा ते खेड प्रस्तावित सहापदरी मार्गाला लवकरच मान्यता मिळेल. आदी विषयांवर आढळराव यांनी उपस्थितांना यावेळी आश्वस्थ केले.











