- महापौरांकडून शिवशाहीर बाबासाहेबांना श्रध्दांजली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२१) :- पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रासह महाराष्ट्राच्या इतिहासाचा प्रचार प्रसार केला. त्यांच्या निधनाने ज्येष्ठ इतिहास संशोधक, सांस्कृतिक क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपले असल्याची भावना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केली.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने महापौर माई ढोरे यांनी बाबासाहेबांच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली.
जाणता राजा या ऐतिहासिक महानाट्यातून महाराष्ट्राच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जगभर पोहोचविले. पिंपरी चिंचवड शहरातदेखील विविध व्याख्यानमाला आणि कार्यक्रमांमधून त्यांनी ऐतिहासिक विषय मांडले. शहरात झालेल्या बाबासाहेबांच्या भेटी आणि विविध कार्यक्रमांच्या स्मृतींना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी यावेळी उजाळा दिला. बाबासाहेबांचे जीवनकार्य आणि त्यांनी केलेले लिखाण प्रत्येकाच्या स्मरणात राहील असे महापौर उषा उर्फ माई ढोरे यावेळी म्हणाल्या.