- नगरसेविका सौ. सविता बाळकृष्ण खुळे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या रहाटणी प्रभाग क्रमांक २७ येथील स्थानिक नगरसेविका सौ. सविता बाळकृष्ण खुळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांची सभापतीपदी निवड निश्चित मानली जात आहे.
महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठी शुक्रवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज दाखल करायचे होते. यावेळी खुळे यांचा अर्ज सादर करण्यात आला. याप्रसंगी महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर घुले, नगरसेविका उषा मुंडे, योगिता नागरगोजे, नगरसेवक अंबादास कांबळे, अनिल नखाते, सामाजिक कार्यकर्ते नरेश खुळे, आदेश आप्पा राजवडे, महाराष्ट्र चॅम्पियन बाबा तांबे आदी उपस्थित होते.
महापालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. त्यात बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार कामकाज पाहणार आहेत.