- तब्बल ३६ लाखांचा खर्च; स्थायीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथे नवीन जिजामाता रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यासाठी ३६ लाख रुपये खर्च येणार आहे. हे काम निविदा न काढता थेट पद्धतीने केले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायीसमोर ठेवण्यात आला आहे.
महापालिकेच्या वतीने शहरामध्ये भोसरी, आकुर्डी, थेरगाव व पिंपरीतील जिजामाता रुग्णालय नव्याने सुरू करण्यात आले आहेत. या रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, शस्त्रक्रिया विभाग सुरू नसल्याने शस्त्रक्रिया करता येत नाहीत. त्यामुळे याठिकाणी तातडीने शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे.
३१ डिसेंबर २०२१ पूर्वी जिजामाता रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात येणार आहे. कक्ष सुरू करण्यासाठी शस्त्रक्रिया विभागामधील वातानुकुलन यंत्रणेसाठी आवश्यक असलेले एस.एस.प्लेनम, डक्टीग, ग्रील हे कामकाज पूर्ण होणे आवश्यक आहे. त्याशिवाय शस्त्रक्रिया विभाग सुरू करणे शक्य नाही. डिसेंबर अखेर पूर्ण करायचे असल्याने त्यासाठी अवघा दीड महिन्याचा कालावधी बाकी राहिला आहे. या कालावधीमध्ये निविदा काढून काम पूर्ण करण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे काम थेट पद्धतीने देण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया विभागामधील वातानुकुलन यंत्रणेचे काम करण्यासाठी अंदाजे १६ लाख २० हजार रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे मूळ कामाच्या निविदा रक्कमेमध्ये ही रक्कम वाढविण्यात येणार आहे. या वाढीव खर्चास २५ ऑक्टोबर २०२१ रोजी आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार मेसर्स कमल ईलेक्ट्रीक एंटरप्रायजेस यांच्याकडून काम करून घेण्यात येणार आहे.