- महिलेचा विनयभंग; दोघांना पोलिसांकडून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२१) :- काळेवाडीतील पवनानगर येथे महिलेच्या भावाने घेतलेल्या दुचाकीचे पाच हप्ते थकले असल्याने कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपनीचा वसुली एजंट फिर्यादीच्या घरी आला. फिर्यादी यांनी एजंटला उद्या ऑफिसमध्ये जाऊन पैसे भरणार असल्याचे सांगितले.
एजंटने त्याच्याकडे पैसे दिले नसल्याच्या रागातून फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. फिर्यादीच्या पतीने याबाबत एजंटला जाब विचारला असता एजंटने त्याच्या साथीदारांसोबत मिळून आरडा-ओरडा केला. दरम्यान, कोयता हवेत फिरवत आरोपी आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांची घरे बंद करून घेतली. फिर्यादी यांनी देखील स्वतःचे घर बंद केले. आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादीच्या घराच्या दारावर लाथा मारल्या. तसेच बाहेर पाण्याने भरलेला बॅरल व बादलीतील पाणी सांडून दोन दुचाकींची तोडफोड करून नुकसान केले.
ही घटना रविवारी (दि. १४) रोजी सायंकाळी घडली. २५ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आशिष हणमंत कांबळे (वय २५, रा. पिंपरी), अल्पेश हणमंत कांबळे (वय २३, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.












