- वाहतूक कोंडी, उड्डाणपुलाखालील विक्रेत्यांच्या अतिक्रमणाचे?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२१) :- भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार रस्ता विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे ३१ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. या कामासाठी विद्युतविषयक कामांसाठी ३ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.
अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार भोसरी उड्डाणपुलाखाली असलेले सुमारे दीड किलोमीटर अंतरांचा रस्ता व पदपथ विकसित केला जात आहे. स्टॅम्प काँक्रीट, गती नियंत्रणासाठी कोबाल्ट स्टोन, रेलिंग, सायकल स्टॅण्ड, माहिती फलक अशा विविध कामांचा समावेश आहे. त्यासाठी सुमारे ३१ कोटी ३ लाख इतका खर्च अपेक्षित आहे.
अर्बन स्ट्रीटवर प्रकाशव्यवस्था करण्यासाठी पालिकेच्या विद्युत विभागाकडून वेगळी निविदा काढण्यात आली आहे. अर्बन स्ट्रीटसाठी विद्युतविषयक कामे केली जाणार आहेत. या निविदेचा एकूण खर्च २ कोटी ९८ लाख ६९ हजार ३३५ रुपये इतका होता. हे काम एस. टी. इलेक्ट्रीकल्स प्रा. लि. या कंत्राटदाराने २४.३ टक्के कमी म्हणजेच २ कोटी २६ लाख ३ हजार ५१७ रुपयांपर्यंत करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार त्यांच्याकडून हे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थायी समितीने या कामास मान्यता दिली आहे.
दरम्यान, उड्डाणपुलाखाली विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. अर्बन स्ट्रीट डिझाईन अंतर्गत रस्ते छोटे व पदपथ मोठे केल्याने विक्रेत्यांचे अतिक्रमण आणखी वाढण्याची शक्यता आहे.