- पीएच. डी. संशोधन केंद्राचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२१) :- यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या पीएच. डी. संशोधन केंद्रातर्फे आयोजित संशोधनपद्धती या विषयावरील दोन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रथम सत्रात रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चचे व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा. डॉ. सारंग भोला यांनी ‘गृहीतके आणि संशोधन प्रस्ताव तयार करणे’ या विषयावर विविध उदाहरणे देत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून संशोधन पद्धतीचे प्रकार, माहिती संकलनाचे तंत्र, प्रश्नावलीचे स्वरूप आदी मुद्यांबाबत माहिती दिली.
तर कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे विभागप्रमुख व अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी त्यांच्या व्याख्यानात ‘संशोधन प्रक्रिया व पद्धती’ या विषयावर मार्गदर्शन केले. संशोधन विषय निवडल्यानंतर त्याची मांडणी कशी करावी, संशोधन करताना कोणते नियम पाळावेत आदींबाबत त्यांनी विविध उदाहरणे सांगत सविस्तर मार्गदर्शन केले. आपले संशोधन नाविन्यपूर्ण असायला हवे यादृष्टीने प्रयत्नशील राहावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना व्याख्यात्यांनी समाधानकारक उत्तरे देत त्यांच्या शंकाचे निरसन केले. दोनशेहुन अधिक जणांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. तर प्रास्ताविक करताना आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी दोन्ही व्याख्यात्यांचे स्वागत केले.
पीएच. डी. विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त होती, असे मत यावेळी डॉ. मुंढे यांनी व्यक्त केले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. प्रशांत वाडकर यांनी काम पाहिले, तर आभार प्रदर्शन डॉ. सचिन मिसाळ यांनी केले.