- आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना पालिका आयुक्तांची तंबी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात, सर्व क्षेत्रीय कार्यालये, करसंकलन विभागीय कार्यालये, सर्व शाळा, सर्व दवाखाने आणि रुग्णालये तसेच महानगरपालिकेमार्फत सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनांमध्ये पुनर्वापर न होणा-या प्लॅस्टीक वापराबाबत घालण्यात आलेल्या निर्बंधाची अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी सोमवारी (दि. २२) दिले. आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही आयुक्त पाटील यांनी दिला आहे.
दि. २३ मार्च २०१८ चे अधिसूचनेद्वारे प्लॅस्टीक हे अविघटनशील असल्यामुळे महाराष्ट्र शासनामार्फत प्लॅस्टीकचे उत्पादन, वापर विक्री, वाहतुक, हाताळणी आणि साठवणूकीवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्या अनुशषंगाने महापालिकेच्या मुख्य कार्यालयात तसेच क्षेत्रीय कार्यालये, शाळा, दवाखाने व इतर सर्व इमारतींमध्ये प्लॅस्टीक पिशव्या आणि प्लॅस्टीकपासून निर्मित वस्तूंच्या वापरावर घालण्यात आलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याबाबत आयुक्त पाटील यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठी प्लॅस्टीकच्या बाटल्यांचा वापर न करता ग्लास अथवा धातूपासून निर्मित बाटल्यांचा वापर करण्यात यावा असे आदेशात नमूद केले आहे. या आदेशानुसार सर्व कार्यालयांमध्ये पुनर्वापर न होणा-या प्लॅस्टीकचा वापर होणार नाही याची खबरदारी विभागप्रमुखांनी घ्यावी. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही संबंधित विभागप्रमुखांची असून विभागामध्ये कोठेही प्लॅस्टीकचा वापर झाल्याचे आढळून आल्यास विभागप्रमुखांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आदेशाद्वारे देण्यात आला आहे.