- ऑडी, फॉक्सवॅगन, टोयोटा, इनोव्हा अशा महागड्या गाड्यांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२१) :- नागरिकांकडून भाड्याने घेतलेल्या मोटारींचे भाडे थकवून त्या गाड्यांची कमी किमतीत विक्री करणाऱ्या खेड तालुक्यातील साबळेवाडीच्या माजी सरपंचाला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ३ कोटी ९० लाख रुपये किमतीच्या ३८ मोटारी जप्त केल्या. या मोटारी मूळ मालकांना मंगळवारी (दि. २३) परत करण्यात आल्या.
भोसरी पोलीस ठाण्यात झालेल्या या कार्यक्रमाला उपायुक्त मचक इप्पर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम आदी उपस्थित होते. सागर मोहन साबळे (वय ३४, रा. साबळेवाडी, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. साबळे हा नागरिकांकडून गाड्या भाड्याने घ्यायचा. कायदेशीर करारनामाही त्याबाबत तयार करायचा. काही दिवस भाडे देऊन नंतर कमी किमतीत त्या गाड्यांची विक्री करायचा. हा फॉर्म्युला वापरून साबळे याने अनेकांना गंडा घातला.
ऑडी, फॉक्सवॅगन, टोयोटा, इनोव्हा, महिंद्रा, मारुती सुझुकी, टाटा, ह्युंदाई या सारख्या महागड्या कंपन्यांच्या २३ गाड्या हस्तगत केल्या. नीलेश गोजालू (रा. कासारवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आणखी १५ महागड्या मोटारी जप्त केल्या. साबळे हा पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी पुणे, बीड, माजलगाव, संभाजीनगर तसेच इतर ठिकाणावरून ३ कोटी ९० लाखांच्या ३८ मोटारी जप्त केल्या.
पोलिसांनी तपासादरम्यान जप्त केलेल्या मोटारी मूळ मालकांना परत देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी वाहने भाड्याने देताना तसेच वाहनांशी संबंधित कोणतेही व्यवहार करताना काळजी घ्यावी. सर्व बाबींची खातरजमा करावी, असे आवाहन पोलीस उपयुक्त मंचक इप्पर यांनी केले आहे.