- वाढदिवसानिमित्त लावलेले फ्लेक्स हटविण्याचे प्रशासनाला फर्मान..
- कार्यकर्त्यांकडून पोस्टद्वारे आयुक्तांच्या कार्यपद्धतीला आव्हान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२१) :- आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात सर्वत्र बॅनर आणि पोस्टर्स लागलेले आहेत. संपूर्ण शहरात काही अधिकृत तर काही अनधिकृत बॅनर आणि पोस्टर लावलेले आहेत. याबाबत पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश काढले आहेत.
आदेशात म्हटले आहे कि, नियम सर्वांसाठी समान असला पाहिजे. मोठमोठे होर्डिंग्ज सोडून रस्त्यावर आणि फूटपाथवर असलेले बॅनर आणि पोस्टर्स काढून टाकावेत. अगोदर फलक लावणा-याला फलक काढून टाकण्यास सांगावे. जर, त्यांनी पुढील सहा तासांत फलक काढले नाही. तर, कृपया महापालिकेने ते काढून टाकावेत.
काढताना बॅनर फाडू नका, व्यवस्थित, सावधानतेने काढावा. संपूर्ण शहरात हे काम करावे. फुटपाथवरील फलक काढण्यासाठी संबंधिताला अगोदर संधी द्यावी आणि सक्त ताकीदही द्यावी. तरीही फलक काढला नाही. तर, पालिकेने तो काढावा, अशा सूचना आयुक्त पाटील यांनी दिल्या आहेत.
कार्यकर्त्यांकडून पोस्टद्वारे आयुक्तांच्या कार्यपद्धतीला आव्हान…
कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे. त्या पोस्टमध्ये थेट आयुक्तांनाच आव्हान देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, ”फुंकर मारून दिवा विझवता येतो. अगरबत्ती विझवता येत नाही. भितीवरचे रस्त्यावरचे बॅनर हटवता येतीलही, पण दादांच्या स्वभावाने कामाच्या प्रभावाने जवळ आलेली माणस आणि माणसांच्या मनास दादांबद्दल असणारे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी हटविता येणार नाही. २०२२ पालिका पुन्हा भाजपाकडेच आणि आमदारदादांची कुच खासदारकीकडे; मग बॅनर महाराष्ट्रातून दिल्ली अन भारतभर लागतील सगळीकडेच”…