- वाहनचालकांच्या परीक्षेसाठी आता आभासी यंत्रणा?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड आरटीओला दोन सिम्युलेटर मिळणार आहेत. हे सिम्युलेटर लावण्यासाठी परिवहन अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयांत तातडीने जागा निश्चित करण्यासह संबंधित संस्थेला सर्व मदत करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.
सिम्युलेटर लागल्यावर त्यावर कायम वाहन चालवण्याचा परवाना घेण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांची परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. सध्या एका उमेदवाराच्या वाहन चालवण्याच्या परीक्षेसाठी ३ ते ४ मिनिटांचा वेळ दिला जातो. परंतु सिम्युलेटरवर हा वेळ १५ मिनिटांच्या जवळपास वाढण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष अनुभवाऐवजी संगणक यंत्रणेवरील आभासी वाहन चालवण्याची सिम्युलेटर ही यंत्रणा आहे.
वाहन चालविताना चालक या मशीनच्या ड्रायव्हिंग सीटवर बसल्यानंतर तो कसे वाहन चालवितो याचे संगणकावर रेकॉर्डिंग होईल. चालकाने केलेल्या चुकांचीदेखील नोंद केली जाणार आहे. वाहन चालविणे संपल्यानंतर त्याचा अहवाल येऊन चालकाच्या चुका कळणार आहेत. यासाठी कार्यालयाच्या मोशीमधील इमारतीमध्येच जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली.