- विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रात शाळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२१) :- राज्यात १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून शाळसांठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथी व शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी या मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
या संदर्भातील शासन परिपत्रक आज जारी करण्यात आले आहे. यामध्ये, विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या वर्गात १५ ते २० विद्यार्थी एका वर्गात बसतील. एक बाकावर एकच विद्यार्थी बसेल, विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रात शाळा भरावी. एका वर्गात दोन बाकांमध्ये सहा फुटांचं अंतर असणं आवश्यक आहे. असं सांगण्यात आलं आहे.
शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण (दोन लसी) झालेल्यांनाच शाळा/ कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात यावा. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ साठीची ४८ तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी. विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे. शाळेतील परिपाठ, स्नेह संमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक-पालक बैठका देखील शक्यतो ऑनलाईन घ्याव्यात. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. असेही सांगण्यात आले आहे.