- १ डिसेंबरपासून शहरातील सुरु होणाऱ्या शाळा पुन्हा लांबणीवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यामुळे उद्या (१ डिसेंबर) पासून शहरातील पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या वतीने करोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना आज जारी करण्यात आल्या आहेत.
या संदर्भात काढण्यात आलेल्या परिपत्रकात सांगण्यात आले आहे की, इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग १ डिसेंबर २०२१ पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु जगभरात करोना विषाणूनचा नवा प्रकार ओमायक्रॉन आढळून आला असून व जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणू प्रकारास Variant Of Concern म्हणून जाहीर केले आहे. या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये यास्तव या विषाणू विरोधी प्रतिबंधात्मक उपाययोजना व आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आदेश निर्गमित केले जात आहेत.
महापालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास १५ डिसेंबर २०२१ पर्यंत स्थगिती देण्यात येत असून, करोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबबत १५ डिसेंबर २०२१ नंतर पुढील आदेश निर्गमित करण्यात येतील. इयत्ता पहिली ते सातवीचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णत: बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास मूभा राहील.