- निगडीतील घटना; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२१) :- सोनसाखळी चोरून पळून जाणाऱ्या आरोपीचा पाठलाग करत असताना आरोपीने जर्किनमध्ये ठेवलेला चाकू काढला आणि चाकूने पोलीस हवालदारावर हल्ला केला. त्यांनी वार चुकवला.
आरोपी सोबत झटापटी चालू असताना आरोपीने पोलीस हवालदार आणि पोलीस मित्र यांच्या डोळ्यावर स्प्रे मारून त्यांना जखमी केले. हा प्रकार सोमवारी (दि. २९) सकाळी साडेसातच्या दरम्यान निगडी प्राधिकरण येथे घडला.
पोलीस हवालदार सतीश जालिंदर ढोले (वय ४२) असे जखमी पोलिसाचे नाव आहे. त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजू खेमु राठोड (वय ३९, रा. उजनी, एकंबी, ता. औसा, जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.