- सामाजिक न्याय विभागाची पालिका आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२१) :- कोविड सेंटर सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोशी येथील तीन वसतिगृहे ताब्यात घेतली आहेत. मात्र, आता करोनाची दुसरी लाट ओसरल्याने महापालिका प्रशासनाने आता ही वसतिगृहे पुन्हा हस्तांतरित करावीत, अशी मागणी सामाजिक न्याय विभागाने पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करून घेण्यावरील मर्यादा लक्षात घेऊन, सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे ताब्यात घेऊन त्याठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मोशीत २५० क्षमतेचे मुलींचे वसतिगृह, २५० क्षमतेचे मुलांचे आणि गुणवंत मुलांचे वसतिगृहांचा समावेश आहे. समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी महापालिका आयुक्तांना याबाबत कळविले आहे. विद्यार्थ्यांकडून देखील वसतिगृह सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तात्काळ इमारती हस्तांतर केल्यानंतरच विद्यार्थ्यांना त्याठिकाणी प्रवेश देणे सोयीस्कर होणार आहे, असे या पत्रव्यवहारात म्हटले आहे.
शासकीय वसतिगृहाच्या इमारती ताब्यात देताना जिल्हाधिकारी यांच्याकडे असलेल्या निधीतून आवश्यक ती दुरुस्ती करूनच ताब्यात द्याव्यात. त्यासाठी निधीतून स्थानिक पातळीवर योग्य ती कारवाई करावी, असे सूचित केले आहे. या इमारती सामाजिक न्याय विभागाच्या ताब्यात देताना स्वच्छता निर्जंतुकीकरण आणि आवश्यक त्या दुरुस्ती करून देण्यात याव्यात, असे देखील पत्रात नमूद करण्यात आले आहे.