- पावसाच्या पाण्यामुळे मोरेवस्तीतील जलमय रस्त्यांना मोकळी वाट..
- नागरिकांनो ओमायक्रोनच्या शक्यतेमुळे घराबाहेर पडणे टाळा – पांडाभाऊ साने…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाउस आणि कडाक्याची थंडी अशी स्थिती पहावयास मिळत आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे चिखलीतील प्रभाग १ मधील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप झाले आहे. पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा न झाल्यामुळे रस्त्यावरच पावसाच्या पाण्याचा जोरदार प्रवाह पाहायला मिळत होता. नागरिकांना रस्त्यावरून जाणे मुश्कील होत होते.
अखेर नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन प्रभागातील ‘नगरसेवक नव्हे तर एक जनसेवक’ या नात्याने पांडाभाऊ साने यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भर पावसात रस्त्यावरील साचलेल्या पाण्याला मोकळी वाट करून दिली आणि रस्ता मोकळा करून दिला. त्यांच्या या भरपावसात केलेल्या कामगिरीचे प्रभागात कौतुक होत आहे.
याबाबत माहिती देताना पांडाभाऊ साने म्हणाले, पावसाने शहरात पहिली वर्दी देताच, चिखलीसह मोरेवस्ती भागात संपूर्ण व्यवस्थाच कोलमडण्याचा प्रकार घडतोय. अनेक भागांतील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांना एखाद्या नाल्याचे स्वरूप प्राप्त होते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. हे चित्र संपूर्ण पावसाळी हंगामात अनेकदा पाहायला मिळते. पालिका प्रशासनाने रस्ते तयार करताना चेंबरची उंची तसेच पावसाचे पाणी जाण्यासाठी उतार या बाबीकडे दुर्लक्ष केले. रस्त्यांची ‘लेव्हल’ एकसारखी नाही.चुकीच्या पद्धतीने रस्ते बनविले. याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. दरवर्षी पावसाळ्यात परिसरातील रस्त्यांवर पाणी साचते. सध्यातरी कार्यकर्त्यांच्या मदतीने रस्ते पाणीमुक्त केले असून रस्त्यांवर पूर्वीसारखी रहदारी सुरु झाली आहे.
ओमायक्रोनच्या शक्यतेमुळे सध्या शहरात पुन्हा कोरोना डोकेवर काढण्याची शक्यता आहे. प्रचंड गारठा आणि पाउस यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे. तसेच पावसाळीग्रस्त आणि इतर अडचणी असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन साने यांनी केले आहे.
















