- सांगवी पोलीस ठाण्यातील घटना; महिला पोलीस उपनिरीक्षकाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२१) :- तक्रारदार यांच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज आला असून या तक्रार अर्जाची चौकशी महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके या करीत आहेत. तक्रार अर्जावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सोळुंके यांनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख रुपयांची मागणी केली. सोळुंके यांच्या सांगण्यावरुन सहायक पोलीस उपनिरीक्षक देसाई याने तडजोडी करुन ७० हजार रुपये मागितले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.
त्यानुसार पथकाने २५ नोव्हेंबर आणि २६ नोव्हेंबर रोजी पडताळणी केली. त्यावेळी सोळुंके यांच्या सांगण्यावर देसाई यांनी एक लाख रुपये लाच मागून तडजोडीत ७० हजार लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज (गुरुवार) तक्रारदार यांना ७० हजार रुपयांची रक्कम घेऊन पाठवण्यात आले. तक्रारदार यांच्याकडून देसाई याने लाच स्विकारली. एसीबीचे अधिकारी त्यांना पकडण्यासाठी गेले असता पथकातील अधिकारी यांना धक्का देऊन देसाई दुचाकीवरुन लाचेच्या रक्कमेसह फरार झाला आहे. तर महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके यांना ताब्यात घेण्यात आले.
महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा सिध्दराम सोळुंके (वय २८), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक बाळकृष्ण देसाई असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहे. सोळुंके आणि देसाई हे सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याप्रकरणी ४२ वर्षाच्या व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.
















