- शिवसेना संघटक संतोष सौंदणकर यांची मागणी..
- प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांची सकारात्मक भूमिका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२१) :- पुण्यातील महावितरण कार्यालयातले उपहारगृह बंद असल्यामुळे कर्मचा-यांची प्रचंड गैरसोय होत आहे. कोरोनाचा प्रदुर्भाव अद्याप अटोक्यात आलेला नाही. तरी बाहेरील हॉटेलमध्ये जेवन किंवा नाष्टा करणे आरोग्याला घातक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यालयातील कॅन्टीन तातडीने सुरू करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना संघटक तथा महाराष्ट्र राज्य सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांनी केली आहे.
यासंदर्भात सौंदणकर यांनी महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कार्यालयात चारशे ते साडेचारशे कर्मचा-यांचा स्टाफ कार्यरत आहे. त्यांची नाष्टा व जेवनाची सोय व्हावी, यासाठी कार्यालयांतर्गत कॅन्टीन सुरू करण्यात आली आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून ही कॅन्टीन बंद आहे. त्यामुळे कर्मचा-यांची अत्यंत गैरसोय होत आहे.
नाष्टा अथवा जेवन करण्यासाठी कर्मचा-यांना बाहेरच्या हॉटेलमध्ये जावे लागत आहे. ही बाब अत्यंत खेदजनक असून कर्मचा-यांच्या आरोग्यास घातक ठरणारी आहे. मुंबईतील मख्य कार्यालयातील कर्मचा-यांना प्रकाशगडपासून ते रास्ता पेठपर्यंतच्या उपहारगृहांमध्ये वाजवी दरात खाद्य पदार्थ मिळतात. पुणे प्रादेशिक कार्यालयातील कर्मचा-यांचा विचार करून कॅन्टीन वेळेत सुरू करावी.
उपहार गृहाची सुविधा स्वस्त व चांगल्या दर्जाची देणे आपले प्रथम कर्तव्य आहे. तरीही गेली सहा महिने पुणे कार्यालयातील कॅन्टीन बंद आहे. तरी, ही कॅन्टीन व झेरॉक्स सेंटर त्वरीत सुरू करावीत, अशी मागणी सौंदणकर यांनी निवेदनाद्वारे केली. त्यांच्या मागणीची दखल घेऊन प्रादेशिक संचालक नाळे यांनी तातडीने कॅन्टीन आणि झेरॉक्स सेंटर सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. लवकरच कर्मचा-यांच्या जेवनाची, नाष्ट्याची सोय करण्यासाठी त्यांनी पावले उचलली आहेत, अशी माहिती सौंदणकर यांनी दिली.
















