- महापौर माई ढोरे यांचे नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, शहरात ६ रुग्णांना ओमायक्रॉन झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. २४ नोव्हेंबर रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेली ४४ वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रविवारी (दि. ५) संध्याकाळी दिला आहे. कोरोनासारखे आपल्याला कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूवर यश मिळवायचे आहे. महानगरपालिकेच्या वतीने सापडलेल्या रुग्णावर योग्य उपचार चालू आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता मास्क वापरावे व स्वतःची काळजी घ्यावी.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, नायजेरियातून एकच महिला आली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची टेस्ट करण्यात आली आहे. या केसमध्ये इतरांना संसर्ग झाला असेल असं प्रथमदर्शी वाटत नाही. यापुढे प्रत्येकाने काळजी घेणे, मास्क वापरणे, गर्दी टाळणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे ज्यांनी लसीकरण केले नाही त्यांनी लसीकरण करून घ्यावे. निर्बंधाबाबत पुढे जशी परिस्थिती ओढावेल तसे निर्णय घेतले जातील. आत्ताच्या परिस्थितीवर नागरिकांना पॅनिक करणे योग्य नाही,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.