- ४६ प्रभाग, नगरसेवकांची संख्या १३९; पालिकेकडून अंतिम मोहर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२१) :- आगामी महापालिका निवडणुकीसाठीचा प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला पिंपरी चिंचवड महापालिकेकडून सोमवारी सादर करण्यात आला.
पिंपरी चिंचवड महापालिकेत ४६ प्रभाग असून त्यामध्ये ४५ प्रभाग त्रिसदस्यीय तर एक प्रभाग चार नगरसेवकांचा असेल, नगरसेवकांची संख्या १३९ असेल, असे या आराखडय़ात स्पष्ट करण्यात आले आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या आराखडय़ांनुसार पुढील टप्प्यात राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचना अंतिम केली जाणार आहे.
निवडणुकीसाठी कच्चा आराखडा ३० नोव्हेंबपर्यंत सादर करण्याची सूचना महापालिकेला राज्य निवडणूक आयोगाने केली होती. मात्र प्रभागाचा कच्चा आराखडा सादर करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महापालिकेने आयोगाकडे केली होती. त्यानुसार पाच डिसेंबपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ देण्यात आली होती. सहा डिसेंबर रोजी महापालिकांनी कच्चा आराखडा आयोगाला सादर करावा, अशी सूचना करण्यात आली होती. त्यानुसार हा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला.
महापालिकेकडून प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा कायदेशीर झाला आहे की नाही, याची तपासणी राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे. प्रभागाचा आराखडा अंतिम करण्यापूर्वी त्यावर नागरिकांकडून हरकती-सूचना मागविण्यात येणार आहेत.