- पोलिसांनी बारा तासाच्या आत आरोपीला केले जेरबंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२१) :- खुनाचा गुन्हा दाखल असणाऱ्या आरोपीला न्यायालयाने १० डिसेंबर पर्यंत कोठडी सुनावली होती. त्याला पिंपरी पोलीस ठाण्यातील लॉकअप मध्ये ठेवण्यात आले होते. बुधवारी (दि. ८) त्याला पिंपरी लॉकअप मधून चौकशीसाठी वाल्हेकरवाडी पोलीस चौकीत आणण्यात आले होते.
त्यादरम्यान, पोलीस चौकीत आरोपीने जीव गुदमरल्याचा आणि उलटी आल्याचा बहाणा केला आणि चौकीच्या बाहेर आला. त्याने पोलिसांची नजर चुकवून त्याच्या हातातील बेडी काढून ती चौकीतल्या बाकावर ठेवली आणि पळून गेला होता. आरोपी हा घाबरून चौकीतून पळून गेला होता. पोलीस उपनिरीक्षक विकास मडके यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बारा तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला पुन्हा अटक केली आहे. सकाळी त्याला आकुर्डी गावठाण मंदिरापासून ताब्यात घेण्यात आले असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील यांनी सांगितले. राजकुमार रोहित गुप्ता (वय ३४, रा. संभाजीनगर, आकुर्डी. मूळ रा. बिहार) असे पोलीस चौकीतून पळालेल्या आरोपीचे नाव आहे.