- जिल्हा संपर्कप्रमुखांच्या त्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते बुचकळ्यात?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२१) :- गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी भाजपने पिंपरी – चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचाराचा कळस गाठला. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी दिली. महापालिकेतील विविध प्रश्नांबाबत सचिन अहिर यांनी आयुक्त राजेश पाटील यांची गुरुवारी भेट घेतली. शहरातील नागरी प्रश्नांवर चर्चा केली.
यावेळी महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, महिला आघाडीच्या शहरसंघटक ऊर्मिला काळभोर, माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार उपस्थित होते.
राज्य शासनाकडे तक्रारी केल्यानंतर स्मार्ट सिटीची चौकशीचे काय झाले? या पत्रकारांच्या प्रश्नावर अहिर म्हणाले, “भाजपने सत्तेच्या माध्यमातून राजकीय सूड उगविला. त्याचा सोक्षमोक्ष जनतेच्या दरबारातच लावला जाईल. आता महापालिकेतील स्मार्ट सिटी प्रकल्पातील गैरव्यवहाराबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. या प्रकरणी सध्या चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. चौकशी पूर्ण झाली की लवकरच रिझल्ट दिसेल, असेही शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी यावेळी सांगितले.
पिंपरी – चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेला बरोबर घेतले नाही, तर भूमिका काय असेल ? यावर सचिन अहिर म्हणाले, ” भाजपला रोखण्यासाठी मित्रपक्षांनी एकत्रितपणे लढणे आवश्यक आहे. आघाडी युतीचा विचार करत न बसता स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी आहे. आगामी काळात आंदोलन, मोर्च्याच्या माध्यमातून भाजपचा कारभार जनतेसमोर मांडण्यात येईल. “