न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जाने.) :- शहरात सर्व रस्त्यांच्या बाजूने पादचारी मार्ग बनविण्यात आले आहेत. त्या पादचारी मार्गांवर मोठ्या प्रमाणात फेरीवाले, टपऱ्या यांचे जाळे वाढले आहे. हे जाळे दिवसेंदिवस विस्तारत आहे. शहरातील पादचारी मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी शहरातील विविध १३ सामाजिक संघटनांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना मागणीचे पत्र दिले आहे.
त्यात म्हटले आहे की, शहरातील पादचारी मार्गावर एक दुकान असेल तर त्याशेजारी एखादे वाहन थांबलेले असते. तसेच काही लोक उभे असतात. यामुळे विनाकारण रस्त्यावर गर्दी तयार होते. याचा येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य नागरिकांना नाहक त्रास होतो. प्रसंगी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मोकळी ठेवण्यासाठी फेरीवाल्यांवर योग्य ती कारवाई करून पादचारी मार्ग मोकळे करावेत.”
आयुक्त हर्डीकर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त करताना म्हणाले की, ”शहरात हॉकर पॉलिसी बनविण्यात येत आहे. ती तयार झाल्यास फेरीवाल्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. यातून नागरिकांना न्याय मिळेल. पॉलिसी तयार होईपर्यंत मुख्य चौक आणि मुख्य मार्गांवर योग्य तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.”











