न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जाने.) :- काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या लान्स नायक नजीर वाणी या जवानाच्या नावाची घोषणा ‘अशोकचक्र’ साठी करण्यात आली आहे. लष्कराच्या सेवेत येण्यापूर्वी नजीर वाणी यांचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता. मात्र, लष्करात आल्यानंतर त्यांनी देशसेवा केली. त्यांच्या या कार्याचा गौरव ‘अशोक चक्र’ देऊन केला जाणार आहे.
लान्सनायक नजीर वाणी लष्करातील ३४ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. मागील वर्षी शोपियाँ जिल्ह्यात लष्कराने केलेल्या कारवाईत त्यांनी ६ दहशतवाद्यांना ठार केले होते. या ऑपरेशनदरम्यान ते हुतात्मा झाले होते. दहशतवाद्यांविरोधात त्यांनी केलेल्या कारवाईची दखल घेत त्यांना यापूर्वी दोनदा लष्कराकडून सन्मानित करण्यात आले असून, लष्कराचे पदकही मिळाले आहे.











