- आठवडाभरात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या नवीन त्रिसदस्यीय प्रभागांचा निवडणूकीच्या कच्चा आराखड्याचे सादरीकरण मुंबईतील राज्य आयोगासमोर शनिवारी (दि. ११) करण्यात आले. प्रभागरचनेचा आराखडा आयोगाने स्वीकारला आहे.
त्यासंदर्भात पुढील सूचनेची प्रतीक्षा महापालिकेसह राजकीय क्षेत्रास लागली आहे. आयोगाने सूचना केल्यानंतर महापालिकेने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा ५ डिसेंबरला पूर्ण केला आणि तो ६ डिसेंबरला आयोगाकडे सील केलेल्या पेनड्रॉईव्हमध्ये सादर केला. त्यानंतर शनिवारी त्यासंदर्भात आयुक्त राजेश पाटील यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर प्रभागरचनेचा आराखडा सादर केला. कश्या रितीने प्रभागरचना केली आहे. कसे बदल केले, आदी माहिती त्यांनी दिली. सुमारे दीड तास हे सादरीकरण झाले. त्यानंतर आयोगाने आराखडा स्वीकारला आहे. आयोग त्यात काही बदल करू शकते किंवा आहे तास आराखडा मंजूर करून पुढील कार्यवाहीच्या सूचना महापालिकेस करणार आहे.
प्रारूप कच्चा आराखडा जाहीर करणे, अंतिम प्रारूप आराखडा जाहीर करणे, प्रभागनिहाय मतदार यादी, आरक्षणाची सोडत काढणे असा कार्यक्रम आयोग येत्या आठवड्याभरात जाहीर करण्याची शक्यता आहे. तसे, झाल्यास निवडणूका वेळेत होण्याची शक्यता आहे.