- केंद्राच्या नोटरी दुरुस्ती विधेयकाला वकिलांचा विरोध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२१) :- नोटरी दुरुस्ती विधेयकामुळे नोटरी वकीलांसाठी सेवा मर्यादा केवळ १५ वर्षांची करण्यात येणार आहे. नोटरी कायद्यातील या प्रस्तावित दुरुस्तीला नोटरी असोसिएशन पिंपरी – चिंचवडच्या वतीने विरोध दर्शविला आहे. त्यासाठी महाराष्ट्र नोटरी असोसिएशनने येत्या मंगळवारी (दि. १४) नोटरी वकीलांना काम बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनात सहभाग घेणार असल्याचे नोटरी असोसिएशन पिंपरी – चिंचवडचे अध्यक्ष अॅड. पी. डी. नांगरे यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नोटरी अधिनियम विधेयक दुरुस्ती लवकरच संसदेच्या अधिवेशनात सादर केले जाणार आहे. या दुरुस्ती विधेयकामुळे नोटरी वकीलांसाठी कमाल सेवा मर्यादा केवळ १५ वर्षांची करण्यात येणार आहे. या बदलाला आमचा विरोध आहे. नोटरी व्यावसायिकांनी गैरवर्तन केल्यास नोटरी सराव प्रमाणपत्र रद्द करण्याच्या अधिकाराचा विस्तार होणार आहे. तसेच, नोटरी वकीलांच्या कामाचेही डिजिटायझेशन केले जाणार आहे. त्यामुळे वरिष्ठ नोटरींवर उपासमारीचे संकट कोसळणार आहे, त्याला विरोध करण्यासाठी सर्व नोटरी वकीलांना नोटरी अॅथोरिटी (दिल्ली) यांना पत्र पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पिंपरी – चिंचवड शहरात सुमारे १५० ते २०० नोटरी वकील आहेत. पुणे जिल्ह्यात ही संख्या ५०० पर्यंत आहे. नोटरी असोसिएशनचे शिष्टमंडळ याबाबत कायदामंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर सर्व नोटरी वकील संसदेवर मोर्चा काढणार आहेत. नोटरी वकीलांसाठी सेवा कालावधी निश्चित करताना असाच सेवा कालावधी निश्चित करण्याचा नियम आमदार, खासदार, नगरसेवक यांना लागू करणार का, असा सवाल अॅड. नांगरे यांनी उपस्थित केला आहे.