- भ्रष्टाचार निर्मूलन समिती अध्यक्ष खुडे यांची आयुक्तांकडे मागणी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित हॉकी इंडिया स्पर्धेतील पायाभूत सुविधांचा दर्जा सुमार आहे. यासाठी पालिकेच्या क्रीडा स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे हेच जबाबदार आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शांताराम खुडे यांनी पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. शहरात सध्या हॉकी इंडिया या अकराव्या हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हे सामने मेजर ध्यानचंद हॉकी मैदान येथे होत आहेत. यासाठी देशातून अनेक खेळाडू येणार आले आहेत. त्यांच्यासाठी मैदानात मूलभूत सुविधा उपलब्ध असणे गरजेचे होते. मात्र, खेळाडूंसाठी येथे अपुऱ्या मूलभूत सुविधा असल्याचे डिजिटल आणि वृत्तपत्रातून समजले.
करोडो रुपये खर्चूनसुद्धा महापालिकेची प्रतिमा मालिन होत आहे. याला जबाबदार क्रीडा स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे हेच आहेत. आयुक्तांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
















