- भाविकांनी नियम पाळून दर्शनाचा लाभ घ्यावा; चिंचवड देवस्थान ट्रस्टचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२१) :- श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव २१ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक, वैचारिक-प्रबोधनपर व्याख्याने तसेच आरोग्य शिबिरांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संजीवन समाधी सोहळ्याचे यंदाचे ४६० वे वर्ष आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून ५० टक्के नागरिकांच्या उपस्थितीत हा महोत्सव साजरा होणार असल्याची माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सवाचे उद्घाटन कोल्हापूर करवीरपीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह स्वामी यांच्या हस्ते २१ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता होणार आहे. महोत्सवानिमित्त २१ ते २५ डिसेंबरच्या कालावधीत रोज सकाळी नऊ ते अकरा या वेळेत श्री मोरया गोसावी चरित्रपठण, सुक्त पठण होईल. भजन, कीर्तन, सुगम संगीत, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, श्री मोरया गोसावी चरित्र पठण, सामुदायिक महाभिषेक, रक्तदान शिबिर, याग, श्रीसूक्तपठण, दंत आणि नेत्र चिकित्सा शिबिर, माफक दरात चष्मे वाटप असे विविध कार्यक्रम होणार आहेत. २५ डिसेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता श्री मोरया गोसावी संजीवन समाधीची महापूजा मंदार महाराज देव, चिंचवड ब्रह्मवृंद यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी सात वाजता समाधी मंदिरावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. भाविकांनी नियम पाळून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्टने केले आहे.
















