न्यूज पीसीएमसी नेटवर्क : पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहर व परिसरातून पवना, इंद्रायणी, मुळा या नद्या वाहत असून गेली अनेक वर्षांपासून या नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित होत आहे. प्रशासनाकडून त्याबाबत कुठलीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा -हास होत असून वेळीच योग्य ती कार्यवाही केली नाही तर नजीकच्या काळात शहरात भीषण संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे आयुक्तांनी नदी प्रदुषण रोखण्याकरिता अतितातडीने पाऊले उचलावीत असे निवेदन चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने अध्यक्ष संदेश नवले यांनी आयुक्तांना दिले.
गेल्या ४० ते ५० वर्षापुर्वी पवना नदीचा प्रवाह ज्या पद्धतीने वाहत होता त्या प्रवाहाची दिशा बदलून धन-दांडग्यानी नदीच्या जागेत अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे केली आहेत. आधुनिकीकरण व शहराचा विकास झाल्यामुळेही एम.आय.डी.सीच्या तसेच सोसायटींच्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे या नद्यांना अनेक पर्यावरण विरोधी समस्यांना सामोरे जावे लागत असून या नद्यांचा श्वास कोंडला गेला असल्याचे नवले यांनी या निवेदनात नमूद केले आहे.












