न्यूज पीसीएमसी नेटवर्क : पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महापालिका व प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफ करावा तसेच आघाडी सरकारच्या काळात नेमलेल्या सीताराम कुंठे समितीच्या अहवालाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी याकरिता चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने अध्यक्ष संदेश नवले यांनी मागील काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यात त्यांनी पिंपरी-चिंचवडकरांचा शास्तीकर पूर्णपणे रद्द करण्यात यावा याकरिता सर्वसाधारण सभेत ठराव मांडण्याची मागणी केली होती.
आयुक्तांनी या मागणीला केराची टोपली दाखवली असून जाणूनबुजून या प्रश्नाचे भिजत घोंगडे ठेवले आहे. तसेच मागील महिन्यात मा. मुख्यमंत्र्यांनी चिंचवड येथे अनधिकृत बांधकामे व शास्तीकराबाबत आयुक्तांना संपूर्ण अधिकार देण्याची घोषणा केली. त्याबाबतही आयुक्तांनी आपली उदासीनता दाखवली असल्याचे संदेश नवले म्हणाले.
भाजप सरकार केवळ गाजरांची पुंगी सोडण्यात पटाईत असून शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोनसारख्या प्रश्नांनी शहरातील नागरिक हैराण झाले असतानाही केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. महापालिका आयुक्त व सत्ताधारी पक्ष कोणताही ठोस निर्णय घेत नाहीत ही बाब अतिशय गंभीर असून शहरात बकालपणा निर्माण करण्यास कारणीभूत आहे.
त्यामुळे आयुक्तांनी लवकरात लवकर पाऊले उचलून शास्तीकर व अनधिकृत बांधकामांचा प्रश्न निकाली काढावा व हा बोजा सर्वसामान्य नागरिकांच्या खांद्यावरून काढून टाकावा तसेच शास्तीकरबाधीत बांधकामांची कोणतीही वर्गवारी न ठेवता शहरातील संपूर्ण बांधकामांचा शास्तीकर पूर्णपणे माफ करण्यात यावा अशी फेर मागणी चिंचवड ब्लॉक काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्याचे संदेश नवले यांनी सांगितले.
















