न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२१) :- सांगवीतील काटेपुरम चौकात शनिवारी (दि. १८) सकाळी साडेदहाच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराने साथीदारांसोबत मिळून दुस-या सराईत गुन्हेगाराचा गोळ्या घालून खून केला. या गोळीबारात सराईत गुन्हेगार योगेश जगताप याचा मृत्यू झाला.
मृत योगेश जगताप हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, शस्त्र बाळगणे यांसारखे सात गुन्हे दाखल होते. योगेशचा भाऊ जितेश रवींद्र जगताप (वय २५, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी गणेश हनुमंत मोटे, अश्विन आनंदराव चव्हाण, गणेश बाजीराव ढमाले, अभिजित बाजीराव ढमाले, प्रथमेश लोंढे, गणेश उर्फ मोनू सपकाळ, अक्षय केंगले, निखिल उर्फ डोक्या अशोक गाडुते, राजन उर्फ बबलू रवी नायर, महेश तुकाराम माने, निलेश (सर्व रा. सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी गणेश ढमाले आणि अक्षय केंगले यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींनी आपसात संगनमत करून कट रचला. परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून योगेश जगताप याच्यावर गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या योगेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.