- थेरगाव कर संकलन विभागाकडून सर्वाधिक महसूल जमा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत मिळकत करापोटी चालू आर्थिक वर्षात एकूण ३२८ कोटी रुपये भरणा झाला आहे. थेरगाव कर संकलन विभागीय कार्यालयात सर्वाधिक ८३ कोटी ७३ लाख ९९ हजार ६२२ मिळकतकरांचा भरणा झाला आहे. तर सर्वात कमी २ कोटी ५२ लाख २५ हजार ६२ रूपयांचा कर पिंपरी कॅम्प कार्यालयात जमा झाला आहे.
पिंपरी – चिंचवड शहरात एकूण ५ लाख ५० हजारांपेक्षा अधिक मिळकती आहेत. त्यांच्याकडून महापालिकेच्या कर संकलन कार्यालयाकडून दरवर्षी मिळकतकर वसूल केला जातो. कर संकलन विभागाचे शहरात एकूण १६ विभागीय कार्यालये आहेत. एक एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षात १७ डिसेंबरपर्यंत म्हणजे साडेआठ महिन्यांत एकूण ३२८ कोटी ८२ लाख ४८ हजार १०५ रूपयांचा भरणा झाला आहे. आतापर्यंत एकूण २ लाख २९ हजार २७३ मिळकतधारकांनी मिळकतकरांची बिले भरली आहेत. अद्याप, निम्म्यापेक्षा अधिक मिळकतधारकांनी बिले भरलेली नाहीत.
पिंपरी चिंचवड महापालिकेला २०२०-२१ या अर्थिक वर्षामध्ये करोनामुळे फटका बसला होता या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात मालमत्ता करातून महापालिकेकडे केवळ २२० कोटी १ लाख रुपये जमा झाले होते. तर त्यातुलनेत त्यापूर्वीच्या वर्षामध्ये आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये ३४१ कोटी ५६ लाख रुपये जमा झाले होते. त्या तुलनेत मागीलवर्षी १२१ कोटी ५५ लाख रुपये उत्पन्न कमी मिळाले होते. तर यंदाच्या वर्षी आठ महिन्यामध्ये ३२८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या आर्थिक वर्षाच्या उर्वरित साडेतीन महिन्यामध्ये लक्ष्य प्रशासनाला पूर्ण करावे लागणार आहे.