- तब्बल ३५ हजार प्रवाशांच्या दळणवळणाची होणार सोय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२१) :- पीएमपीच्या ताफ्यात ४० नव्या ई – बस दाखल झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील बसेसपैकी ४० बसेस पीएमपीला प्राप्त झाल्या असून, उर्वरित बसेस डिसेंबरअखेर दाखल होणार आहेत. या ४० बसचे सध्या ‘ आरटीओ ‘ कडे नोंदणीचे काम सुरू आहे. बसची नोंदणी झाल्यावर या गाड्या लगेच वेगवेगळ्या मार्गावर सोडण्यात येणार आहे. यामुळे दिवसाला जवळपास ३५ हजार प्रवाशांची सोय होणार आहे.
हैदराबाद येथील इलेक्ट्रा कारखान्यात याचे उत्पादन सुरू आहे. पीएमपी एकूण ५०० नव्या ई – बसेस घेत आहे. यातील साडेतीनशे बसेस पुणे महापालिका उपलब्ध करून देणार आहे, तर दीडशे बसेस केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ७५ बसेस मिळणे अपेक्षित होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे याला विलंब झाला. यानंतर याच्या चाचणीला देखील विलंब झाला. आता पहिल्या टप्प्यातील ७५ पैकी ४० बसेस मिळाल्या असून, उर्वरित ३५ बसेस या डिसेंबरअखेर मिळण्याची शक्यता आहे.
ज्या प्रमाणात बसेसचे उत्पादन होईल त्याप्रमाणात बस पीएमपीला उपलब्ध होईल. हैदराबाद येथून ४० बसेस ताफ्यात दाखल झाल्या असून, त्या नोंदणीसाठी आरटीओकडे पाठविल्या आहेत. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होताच या गाड्या वेगवेगळ्या मार्गवर धावतील. यातून जवळपास ३५ हजार प्रवासी रोज प्रवास करू शकतील – दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे