- उत्पादित २६ हजार ३०० गाड्यांच्या ब्रेक सिस्टीमध्ये त्रुटी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२१) :- रॉयल एन्फील्ड कंपनीने बुलेट मोटार सायकलच्या क्लासिक ३५० बनावटीच्या २६ हजार ३०० गाड्या सदोष ब्रेक सिस्टीमुळे परत बोलावल्या आहेत. कंपनीने या संबंधात जारी केलेल्या एक निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, आमच्या तज्ज्ञांच्या समितीला ब्रेक सिस्टीममधील एका पार्टमध्ये काही गडबड वाटत आहे. त्यामुळे त्याच्या दुरूस्तीसाठी आम्ही या गाड्या परत बोलावल्या आहेत. गाडीच्या मागच्या ब्रेकवर जादाचा भार पडून ही ब्रेक सिस्टीम नादुरूस्त होऊ शकते किंवा त्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते, याची शंका वाटल्याने ही उपाययोजना कंपनीने केली आहे. ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून दक्षतेचा उपाय म्हणून आम्ही या गाड्यांमध्ये दुरूस्ती करून देणार आहोत असे कंपनीने म्हटले आहे.
१ सप्टेंबर २०२१ ते ५ डिसेंबर २०२१ या अवधीत उत्पादीत करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये हा दोष असल्याने त्या गाड्या परत बोलावून त्यात ही दुरूस्ती केली जाणार आहे.
















