- सर्वेक्षणांतर्गत पालिका ‘मोहल्ला क्लिनिक’ वर देणार भर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२१) :- मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून पिंपरी – चिंचवड शहरातील वैद्यकीय सुविधा सुधारण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू आहेत. शहरात मोहल्ला क्लिनिक कशा पद्धतीने राबविता येईल यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. लवकरच त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे.
शहरात कोणत्या भागात मोहल्ला क्लिनिक असणे आवश्यक आहे? लोकसंख्येनुसार किती मोहल्ला क्लिनिक असावे? या सर्व बाबी या सर्वेक्षणातून समोर येणार आहेत. शहरातील वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी अभ्यास करण्यात येत आहे. त्यानुसार शहरात आगामी काळात वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे.
शहरातील नागरिकांना आपल्या नजीकच्या परिसरात प्राथमिक वैद्यकीय सुविधा मिळाल्या तर याचा नागरिकांना फायदा होणार आहे. शहरातील वैद्यकीय सोयी – सुविधा असणे किती आवश्यक आहे हे कोरोना काळात सिद्ध झाले आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील वैद्यकीय सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. शहरात असलेल्या महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत परंतु, त्या तुलनेत दवाखाने आणि प्राथमिक उपचार केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध नाहीत.