- पालकांच्या शहरातील सबंधित पोलीस ठाण्यात तक्रारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवडगाव, थेरगाव, रुपीनगर येथील अल्पवयीन दोन मतिमंद मुलांसह अन्य एका अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याची घटना घडली आहे. अज्ञात आरोपींच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये सोमवारी (दि. २०) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१५ वर्षीय मतिमंद मुलगा शनिवारी (दि. १८) सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत राहत्या घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेला. तो घरी परत आला नाही. याप्रकरणी संबंधित मुलाच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या मुलाला अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले, असे फिर्यादीत नमूद आहे. ही घटना थेरगाव येथील दगडू पाटीलनगरमध्ये घडली.
दुसऱ्या घटनेत अज्ञात व्यक्तीने १७ वर्षीय मुलाला फूस लावून पळवून नेले. संबंधित मुलाच्या आईने याप्रकणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार शनिवारी (दि. १८) सकाळी साडेसहा ते सायंकाळी सव्वासहा या कालावधीत चिंचवडमधील वेताळनगर झोपडपट्टीत घडला आहे.
तिसऱ्या घटनेत १७ वर्षीय मतिमंद मुलगा रविवारी (दि. १९) दुपारी चारच्या सुमारास बेपत्ता झाला. याबाबत त्याच्या वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या मुलाला फूस लावून अगर पैशांचे आमिष दाखवून पळवून नेले, असे फिर्यादी नमूद आहे. रुपीनगर, तळवडे येथील एका सोसायटीत ही घटना घडली.