- मित्र-मैत्रिणी या कोणत्याही औषधाच्या दुकानात भेटत नाहीत…
- सन १९९४-९५ बॅचच्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह-मेळावा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२१) :- मोशीतील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री. नागेश्वर विद्यालयाचा इ. १० वी तील सन १९९४-९५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल २६ वर्षांनी हाॅटेल ग्रीन वूडस् येथे स्नेह- मेळावा नुकताच थाटामाटात पार पडला. हृदयस्पर्शी सोहळ्यामध्ये सर्व मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना मनसोक्त गप्पांच्या माध्यमातून उजाळा दिला आणि पुन्हा एकदा संपूर्ण दिवसभर शाळेतला वर्ग भरल्याचा अनुभव घेतला.
आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने ज्ञानाचा प्रकाश टाकत ज्यांनी जगण्याची नवी दिशा दिली. तसेच जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं. कारण कष्टाला पर्याय नसतो. तसेच समाजॠणातून उतराई होण्याकरिता आपलं शिक्षण कामी आलं पाहिजे. अशाप्रकारचे सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत घडण्यासाठी आवश्यक असणारे संस्कार देणारे गुरूजन आणि यशवंत विद्यार्थी घडविण्याचा इतिहास जिच्या कणाकणात ठासून भरलेला आहे अशा आपल्या विद्यालयाप्रती एवढे दिवस मनात साठवून ठेवलेल्या भावनांना मोकळी वाट करून देताना सर्व मित्रमैत्रिणींच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू हे या संस्मरणीय सोहळ्याचे फलित होते.
‘किती सांगू मी सांगू कुणाला..आज आनंदी आनंद झाला’..असं सर्वांना वाटत होतं. सर्वजण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आपापल्या परीने यशस्वी झालेले आहेत परंतू शालेय जीवनात खिजगिणतीत नसणाऱ्या काही मित्रमैत्रिणींनी आज यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली आहे. याचा मनःस्वी अभिमान असल्याचे बोलताना खऱ्या मैत्रीची आठवण झाली. मित्र-मैत्रिणी हे कोणत्याही औषधाच्या दुकानात भेटत नाही. ही एका विद्यार्थ्याची भावना किती बोलकी होती. लहानपणी केलेल्या चुका पुन्हा पुन्हा न करता निःस्वार्थ भावनेने समाजाचं देणं देत राहीलं पाहीजे. ज्यायोगे मिळणारं समाधान शब्दांत सांगता येत नाही, अशा संमिश्र भावनांनी संपन्न झालेला माजी विद्यार्थी स्नेह मेळावा म्हणजे संस्मरणीय आठवणींचा ठेवा होता.
तुम्ही आमच्याप्रती असलेल्या प्रेम आणि आदरापोटी आमच्यासमवेत घालवलेला संपूर्ण दिवस हा आमच्याकरीता सर्वोच्च पुरस्कार असल्याचे बोलून दाखवत तुम्ही आमचे सर्वस्व आहात. ही गुरूजनांची प्रतिक्रिया मनाला स्पर्श करणारी होती. माझा विद्यार्थी मोठा झाला पाहिजे यापेक्षा एका शिक्षकाला अजून काहीच नको असतं. तुम्ही सर्वजण आमच्याकरीता सोनेरी वैभव आहात. या वाक्याने वातावरण अगदी भावुक झालं होतं. जुन्या आठवणींचा चलचित्रपट अगदी भुर्र्कन डोळ्यासमोर तरळून गेला.
शरीरसंपदा आणि उत्तम आरोग्यासाठी बहुमोल मार्गदर्शन करणारे गुरूवर्य श्री. गरूड सर चिरतरूण भासले. प्रत्येकाने भक्तीरसात आपलं जीवन समर्पित केलं पाहीजे. हे गुरूवर्य श्री. चौधरी सरांचे सांप्रदायिक बोल संस्कारांची आठवण करून देणारे होते. सर्वांनी शारीरिक कष्टाची जाणीव ठेवली पाहीजे असं म्हणत तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं प्रेम पाहून मी भारावून गेलो. गुरूवर्य श्री. मांदळे सरांच्या अध्यक्षीय भाषणातले हे सार आत्मचिंतन करायला लावणारे होते. या सोहळ्यासाठी शालेय जीवनातील गुरूजनांपैकी आदरणीय ह.भ.प.श्री. चौधरी सर, गरूड सर, श्री.दोरगे सर, श्री.चांदगुडे सर, अडागळे बाई, श्री. पंडित सर, श्री.गोतारणे सर, श्री.गाढवे सर, श्री. भरम मामा आदी मान्यवर उपस्थित होते.
या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या आयोजनासाठी सुशांत ससाणे, गणेश मंडलिक, प्रशांत सस्ते, बजरंग वहिले, नंदकुमार जाधव, राजू जाधव, संतोष पवळे, गणेश गव्हाणे, पराग राठी, अविनाश जैद, कविता भरम, योगिता आल्हाट, मनिषा गाढवे, ज्योती वाघुले आणि निलिमा बोराटे यांनी विशेष मेहनत घेतली.
‘गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा’ असे वचन गुरूजनांना देत सर्वजण भविष्यातील स्वप्नांच्या वाटेवरून मार्गस्थ झाले. उपस्थित सर्वांचे स्वागत श्री. बजरंग वहिले यांनी तर, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. कविता भरम या विद्यार्थीनीने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष एरंडे यांनी केले आणि श्री. पराग राठी यांनी सर्वांचे आभार मानले.
















