न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२१) :- स्थायी समिती, क्रीडा शहर सुधारणा समिती, ‘ फ ‘ क्षेत्रीय समितीनंतर आता ‘ क ‘ आणि ‘ ई ‘ क्षेत्रीय समितीचे नगरसेवक दौऱ्यावर जाणार आहेत. हे नगरसेवक स्वच्छ भारत अभिनाया अंतर्गत पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या गोव्यातील पणजी व पंजाबमधील चंदीगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठीच्या खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.
महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणे अपेक्षित आहे. ओमायक्रॉन, कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे जर निवडणूका लांबणीवर गेल्या. तरी, विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाल १२ मार्च २०२२ पर्यंत आहे. म्हणजेच केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली नगरसेवकांनी विविध ठिकाणचे दौरे आयोजित केले आहेत. स्थायी समितीच्या बुधवारी (दि. २९) झालेल्या सभेत ‘ क ‘ आणि ‘ ई ‘ क्षेत्रीय समिती नगरसेवकांच्या अभ्यास दौऱ्याच्या खर्चाला मान्यता दिली.
महापालिकेचे आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. प्रत्येक कार्यालयाच्या हद्दीत १६ नगरसेवक येतात. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ‘ क ‘ क्षेत्रीय कार्यालयातील नगरसेवक आणि प्रभागातील अधिकाऱ्यांचा पणजी, चंदीगड अभ्यास पाहणी दौरा करण्यास समितीने ९ नोव्हेंबरला ठराव मंजूर केला. ‘ ई ‘ क्षेत्रीय समितीचे नगरसेवक, अधिकाऱ्यांच्या पणजी, चंदीगड दौऱ्याचा ठराव समितीने २७ डिसेंबर २०२१ ला केला. या दौऱ्यासाठीच्या खर्चास स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली.















