- सुरेश पाठक लिखित कथासंग्रहांचे प्रकाशन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जाने.) :- लेखकाने विशिष्ट टप्प्यापर्यंतच लिहिले पाहिजे असे नाही. श्वासात श्वास असेपर्यंत लेखकाने आपला लेखनधर्म सोडू नये. लेखकाला रिटायरमेंट नसते. त्यामुळे लेखकाने आयुष्याच्या शेवटपर्यंत जे अनुभव येतील, ते मांडावेत, असे प्रतिपादन गदिमांचे सुपुत्र व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी केले.
ज्येष्ठ साहित्यिक सुरेश त्र्यंबक पाठक लिखित ‘ह्रदयस्पर्शी कथा’ आणि ‘विनोदी कथा’ या दोन कथासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक निरंजन घाटे आणि आनंद माडगूळकर यांच्या हस्ते झाले. थेरगावमधील रोझवुड सभागृहात झालेल्या कार्यक्रमास प्रवीण कारखानीस, मंगेश वाडेकर, चिंतामणी पाठक, दीपा चौधरी, माधव पाठक, विनायक पोळ, क्षमा गोडसे, प्रशांत पाठक आदी उपस्थित होते. दरम्यान, सुरेश पाठक यांचे पंच्याहत्तरीनिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.
माडगूळकर पुढे म्हणाले, लेखकाला जीवनातला प्रत्येक क्षण नव्याने अनुभवावा लागतो. मानवी जीवनातील विसंगती मांडण्याचे सामर्थ्य असणाराच लिहू शकतो. लेखकाने समरस होऊन लिहिण्याचा गुण अंगिकारणे महत्त्वाचे आहे. लेखकाने व्यक्तीच्या अंतरंगात डोकावून लिहिले, तर अधिक प्रत्ययकारी लेखन होईल. सुरेश पाठक यांच्या कथा या समाजातील सर्व अंगांचा परामर्श घेणार्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
निरंजन घाटे म्हणाले, एखादं पुस्तक हातात घेऊन अगदी आवर्जून वेळ काढून वाचावेसे वाटणे, हे चांगल्या लेखकाचे लक्षण आहे. लेखकाने तटस्थ राहून लिहायला हवे. लेखकाने आपल्या लेखनात जास्त भावनिक होऊ नये. पाठक यांनी विनोदी अंगाने केलेले लेखन अंतर्मूख करणारे आहे. त्यांची पुस्तके वाचताना उत्सुकता असते, हेच त्यांच्या कथांचे यश आहे.
सुरेश पाठक यांनी सांगितले, आपल्या पुस्तकाला गदिमांची प्रस्तावना लाभल्यामुळे आणि सुरुवातीच्या टप्प्यात गदिमांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आपणाला लेखनासाठी बळ मिळाले. ही शिदोरी आयुष्यभरासाठी पुरली. इंग्रजी साहित्य वाचण्याचा गदिमांचा सल्ला अंमलात आणत भरपूर इंग्रजी साहित्य वाचले, असेही पाठक म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना पोळ यांनी, तर आभार क्षमा गोडसे यांनी मानले.















