- सोशल मीडिया राज्यप्रमुख बापूसाहेब गोरे यांची महापौर, आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२२) :- कोरोनासारख्या भयावह काळात पत्रकार जोखीम पत्करून पत्रकारिता करतात. त्यांना कसलीही सुरक्षा नाही. महापालिकेने पालिकेत बातमी देण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांचा “धन्वंतरी आरोग्य” योजनेत समावेश करावा, अशी मागणी सोशल मीडिया परिषदेचे राज्यप्रमुख बापूसाहेब गोरे यांनी पत्रकार दिनी पार पडलेल्या कार्यक्रमात केली.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघातर्फे दर्पणकार दिनानिमित्त पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन कै. मधुकर पवळे सभागृहात केले होते. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील, उपमहापौर नानी घुले, सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती अँड. नितीन लांडगे, विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा मानाचा “दर्पणकार ” हा उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार दै. पुढारीचे पत्रकार मिलिंद कांबळे यांना सन्मानपूर्वक वितरित करण्यात आला.
सोशल मीडिया परिषदेचे राज्य प्रमुख बापूसाहेब गोरे म्हणाले की “पत्रकार नेहमी जोखीम पत्करून पत्रकारिता करतात. मागील दोन वर्षांच्या कोरोनाच्या काळात राज्यात १६९ पत्रकार मृत्युमुखी पडले असून पाच हजारापेक्षा जास्त पत्रकार कोरोना बाधित झाले. राज्य सरकारकडून कसलीही मदत मिळाली नाही. पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांनीही कोरोनाच्या काळात स्वतःची व परिवाराच्या जीवाची पर्वा न करता वेळोवेळी बातम्या प्रसारित केल्या आहेत. जोखीम पत्करून पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना पिंपरी चिंचवड महापालिकेने कर्मचारी व पदाधिका-यांसाठीच्या “धन्वंतरी ” योजनेत समावेश करावा, अशी मागणी आयुक्त राजेश पाटील व महापौर माई ढोरे यांच्या उपस्थितीत केली. महापौर माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी या मागणीचा सकारात्मक विचार केला जाणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी तर, सूत्रसंचालन दादाराव आढाव यांनी व पुरस्कारार्थी माहिती वाचन माधुरी कोराड यांनी केले. आभार सोशल मीडिया परिषद अध्यक्ष सूरज साळवे यांनी मानले.