न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जाने. ) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने टाळगाव चिखली येथे राज्यातील पहिले ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यास महासभेत मान्यता दिली आहे.
या कामाच्या निविदेत रिंग करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार सत्ताधारी पदाधिकारी, पालिका अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार यांनी केला असून, त्यांच्या कामाची आयुक्त हर्डीकर यांनी सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष आनंदा यादव यांनी पत्राद्वारे केली आहे.
स्थापत्य विभागाने ४० कोटी ६१ लाख ३ हजार १२५ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली असून, त्यासाठी तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत. एस. एस. साठे यांनी १६ टक्के, व्ही. एम. मातेरे यांनी १४ टक्के, तर बी. के. खोसे यांनी ११. १६ टक्के जादा दराने निविदा भरल्या आहेत. बी. के. खोसे यांनी मूळ निविदा, त्यात रॉयल्टी व मटेरिअल टेस्टिंग चार्जेस असे एकूण ४५ कोटी ८ लाख ९७ हजार रुपयांमध्ये काम करण्याचे मान्य केले असून, या प्रस्तावास स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे.
मात्र, या जादा दराच्या निविदेमुळे तब्बल चाडेचार कोटीचा खर्च अधिक वाढला आहे. त्यामुळे निविदा भरताना रिंग झाली असून, आयुक्त हर्डीकर यांनी या कामाची सीआयडी मार्फत चौकशी करावी, असे या निवेदनात नमूद केले आहे.











